भारतातील मृदा संपत्ती

पर्वतीय मृदा
विविध प्रदेशातील मृदा ही विविध प्रकारात आढळून येते. देशातील काही मृदाप्रकार खालीलप्रकारे आहेत.पर्वतीय मृदा - हा मृदाप्रकार मुख्यत: हिमालय पर्वतात आढळतात. तेथील सुचीपर्णी अरण्यामुळे या मातीला सेंद्रिय द्रव्याचा पुरवठा होतो. त्यामुळे तिच्या थरांची जाडी कमी असते. पॉडझॉल हा मृदाप्रकारही आहे.

गाळाची मृदा
या मृदेने गंगा ब्रह्मपुत्रेचा मैदानी भाग व्यापलेला आहे. पश्चिमेकडील पंजाबच्या काही भागात नदी आणि वारा दोहोंनी वाहून आणलेली मिश्र मृदा आढळते. मैदानाचा उर्वरित भाग मात्र नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेला आहे. या थरांचे दोन उपप्रकार पडतात. भांगर आणि खादर भांगर म्हणजे पूर्वी केव्हा तरी संचित झालेली माती होय. ही माती राखट रंगाची जाड थरांची असून नद्यापासून दूर जास्त उंचीच्या प्रदेशात आढळते. खादर म्हणजे नवी गाळमाती. ही गाळमाती नद्या लगतच्या सखल मैदानी भागात दिसते. दरवर्षी पावसाळ्यात नवीन थरांची भर पडताना आढळून येते.

वाळवंटी मृदा
राजस्थान आणि गुजराथच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशात वालुकामय मृदा आढळते. वनांच्या अभावामुळे या मातीत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण खूपच कमी असून ती सच्छिद्राची आहे.

काळी मृदा
द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेकडील आणि वायव्येकडील भागात बेसाल्ट या अग्नीजन्य खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. नद्यांच्या काठी या मातीचे जड थर असून त्यास ' black cotton soil ' असे नाव आहे. या मातीत कापसाचे पीक चांगले येते. या मृदेच्या वरच्या थरात चिकन मातीचे प्रमाण अधिक असते. या मृदेस रेगुर असेही नाव आहे.

तांबडी मृदा
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, व केरळ मध्ये लोम प्रकारची तांबडी मृदा आढळते. लोहद्रव्याच्या आधिक्यामुळे या मातीस तांबडा रंग प्राप्त झाला आहे. ही माती म्हणजे चिकनमाती आणि वाळूचे मिश्रण असून तीमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी आहे.

3 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.