रविवार, २ सप्टेंबर, २०१८

पर्यटनात दक्षिण आशियात भारत आघाडीवर - ३ सप्टेंबर २०१८

पर्यटनात दक्षिण आशियात भारत आघाडीवर - ३ सप्टेंबर २०१८

* जागतिक पर्यटन क्षेत्रात गेल्या वर्षी विक्रमी वृद्धी बघायला मिळाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.

* या अहवालानुसार २०१७ मध्ये जगभरातील १३२ कोटी ३० लाख नागरिकांनी पर्यटनासाठी परदेश दौरे केले. तर दक्षिण आशियातील पर्यटन वृद्धीत भारत आघाडीवर असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

* संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन शाखेच्या अहवालानुसार पर्यटन व्यवसायात भारताने चांगलीच आघाडी घेतली आहे. भारत दक्षिण आशियातील पर्यटनाच्या बाबतीत आघाडीवर राहिल्याचे या अहवालात म्हटले आहे.

* २०१७ मध्ये भारताला जगभरातील १ कोटी ५५ लाख पर्यटकांनी भेट दिली. पर्यटन व्यवसायातून भारताला यावर्षी २७.३६ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १ लाख ९४ हजार कोटीचे उत्पन्न मिळाले.

* २०१६ मध्ये भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या १ कोटी ४५ लाख इतकी होती. तर पर्यटनातून मिळालेले उत्पन्न २२.४२ अब्ज डॉलर इतके होते.

* दक्षिण आशियातील विविध राष्ट्रांना २०१७ मध्ये २ कोटी ६५ लाख पर्यटकांनी भेट दिली. पर्यटन व्यवसायातून दक्षिण आशियाला ३९.५२ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळाले.

* दक्षिण आशियातील एकूण पर्यटनात भारताचा मोठा वाटा असल्याचे यातून दिसून येते. जागतिक पर्यटकांच्या तुलनेत २०१६ मध्ये व २०१७ मध्ये ८ कोटी ४० लाखांची वाढ बघायला मिळाली. 

* यावर्षातील पर्यटन व्यवसायातील जागतिक उलाढाल १६०० अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख १३ हजार अब्ज रुपये इतकी राहिल्याचे यात म्हटले आहे.  म्हणजे पर्यटन व्यवसायातून दररोज सुमारे ४ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न जागतिक अर्थव्यवस्थेला मिळाले.

* जागतिक एकूण वार्षिक निर्यातीत याचा वाटा ७% इतका आहे. विशेष म्हणजे सलग ८ व्या वर्षी पर्यटन क्षेत्रात वृद्धी नोंदविण्यात आली आहे. 

* जागतिक अर्थव्यवस्था सातत्याने प्रगती करीत असल्याच्या परिणामी पर्यटन व्यवसायात सातत्याने वृद्धी होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.