शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

महाराष्ट्रातील प्रमुख पिके आणि लागवडतंत्र - भात [तांदूळ]

महाराष्ट्रातील प्रमुख पिके आणि लागवडतंत्र

१] भात [तांदूळ]

* लागवड व मशागत - महाराष्ट्रात भातपीक प्रामुख्याने कोकणपट्टी, विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली हे जिल्हे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडील उताराचा व जास्त पावसाचा दक्षिणोत्तर पट्टा [यात नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांचा काही भाग येतो.

* हवामान - उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. पिकांच्या वाढीच्या काळात २४ ते ३२ से तापमान आवश्यक असते.

* जमीन - जांभा खडकापासून तयार झालेल्या मध्यम जमिनीत तसेच, काळसर, खारवट व पाणथळ जमिनीतही हे पीक येऊ शकते.

* पूर्वमशागत - अगोदरचे पीक काढल्यानंतर लगेच जमीन नांगरणे व धसकटे वेचून काढणे. पावसाळा सुरु झाल्यावर दोन वेळा नांगरट करून हेक्टरी २५ गाड्या शेणखत टाकणे किंवा १० मे टन हिरवळीचे खत जमिनीत गाडणे.

* बियाणे - वाफ्यात रोपे तयार करण्यासाठी जाड दाण्याच्या जातीचे बियाणे हेक्टरी ३७.५ किलो इतके, तर बारीक दाण्याच्या जातीचे बियाणे हेक्टरी ३० किलो इतके आवश्यक असते.

* बीजप्रक्रिया - १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ टाकून केलेल्या द्रावणात बी टाकून ढवळून स्थिर झाल्यावर वरती तरंगणारे बी काढून टाकतात. तळाशी राहिलेले बियाणे २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत ४८ तास वाळविल्यानंतर वापरतात.

* रोपे तयार करणे - रोपे तयार करण्यासाठी पूर्वी शेण्या, झाडांच्या फांद्या, पाला पाचोळा यांचा राब करून वाफ्यातील जमीन भाजत असत. नंतर तेथे बी टाकून रोपे केली जात. सुधारित पद्धतीनुसार गादीवाफे तयार करून रोपे तयार केली जातात. एक हेक्टरसाठी लागणारी रोपे १० आर गुंठे क्षेत्रात तयार होऊ शकतात.

* पुनर्लागण - साधारणपणे रोपे ६ ते ८ आठवड्याची झाल्यावर पुनर्लागणी करतात. लावणीच्या क्षेत्रात चिखलणी [पाण्यात, चिखलात नांगरट] केली जाते. एका चुडात ३ ते ४ रोपे, २ ते ३ सेमी खोलीवर सरळ रेषेत लावली जातात.

* रासायनिक खते - लावणीच्या वेळी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश ही खते द्यावी लागतात. लावणीनंतर ३० ते ४० दिवसांनी ४० किलो नत्राचा हफ्ता द्यावा लागतो. निमगरव्या व गरव्या जातीसाठी तिसरी मात्रा २० किलो नत्राची दिली जाते.

* आंतरमशागत - एक बेणणी करावी लागते. लावणीनंतर तीन आठवड्यानी  कर्जत कोळप्याने कोळपणी करणे श्रेयस्कर ठरते.

[पीकसंरक्षण उपाय]

* खोडकिडा - वाफ्यात १५ दिवसांनी १०% फोरेट दाणेदार १० किलोप्रतिहेक्टरी फवारतात. लावणीनंतर २५ दिवसांनी हेच औषध पुन्हा फवारावे लागते.

* लष्करी अळी - १०% बीएचसी + १०% कार्बारिल भुकटी सम प्रमाणात २० किलो संध्याकाळी वारा नसताना धुरळतात.

* तुडतुडे - १०% बीएचसी पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात फवारतात.

* करपा रोग - हेक्टरी २ किलो डायथेन झेड-७८ हे ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारतात.

* कापणी - ९०% पीक तयार झाल्यावर कापणी करतात.

* उत्पन्न - जातीनुसार हेक्टरी ३० ते ४५ क्विंटल उत्पन्न मिळू शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.